मुंबई - मुंबई महापालिकेतील नगरसेवकांकडून करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कामांची दखल घेऊन त्यांच्या कामाचे प्रगतीपुस्तक ''प्रजा फाऊंडेशन'' या एनजीओकडून प्रसिद्ध केले जाते. या प्रगती पुस्तकानुसार मुंबईतील २२७ नगरसेवकांपैकी १० टक्के म्हणजेच २२ 'अ' आणि 'ब' श्रेणीत झाला आहे. तर उर्वरित सर्व नगरसेवकांचा समावेश क, ड, ई, फ श्रेणीत समावेश झाला आहे. गेल्या चार वर्षाच्या कामगिरीची पक्षनिहाय तुलना केली असता सर्वाधिक चांगली कामगिरी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची असून त्यांचे आर्थिक वर्ष २०१७ ते २१ या काळातील गुण ५७.२१ टक्के आहेत, त्याखालोखाल शिवसेनेला ५५.८८ टक्के आणि समाजवादी पार्टीची ५५.०५ टक्के नगरसेवकांची कामगिरी आहे, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले आहे.
नगरसेवकांमध्ये विरोधी पक्ष नेते रवी राजा अव्वल -
प्रजा फाउंडेशन ही एनजीओ दरवर्षी नगरसेवक आणि आमदार यांनी केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल प्रगती पुस्तकरूपाने प्रसिद्ध करते. माहितीच्या अधिकारातून देण्यात आलेल्या माहितीवर आधारित हे प्रगतीपुस्तक असते. आज २०१७ - १८ ते २०२०- २१ या चार वर्षाचे एकत्र प्रगतीपुस्तक ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी मेहता बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, महापालिकेतील पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये काँग्रेसच्या ३, शिवसनेच्या ३ तर भाजपाच्या ४ नगरसेवकांचा समावेश आहे. प्रजा फाऊंडेशनच्या मानकानुसार पहिल्या क्रमांकावरील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांना ८१.१२ टक्के, दुसऱ्या क्रमांकावरील समाधान सरवणकर यांना ८०.४२ टक्के, तिसऱ्या क्रमांकावरील हरीष छेडा यांना ७७.८१ टक्के गुण प्राप्त झाले आहे. मुंबई पालिकेतील एकूण २२७ नगरसेवकांपैकी केवळ १० टक्के म्हणजेच २२ नगरसेवकांचा 'अ' आणि 'ब' श्रेणीत समावेश आहे. तर उर्वरित नगरसेवकांना क, ड, ई, फ श्रेणीत समावेश झाला आहे.
१२७ नगरसेवक 'सी' व 'डी' श्रेणीत -
संयुक्त माहितीचे विश्लेषण केले असता या वेळी प्रगती पुस्तकाचे सरासरी गुण ५५.१० टक्के आहेत. तर मागील टर्ममध्ये एप्रिल २०१२ ते मार्च २०१६ मध्ये सरासरी गुण ५८.९२ टक्के होते. एप्रिल २०१७ ते मार्च २०२१ यादरम्यान, एकूण २२० नगरसेवकांपैकी ७ नगरसेवक 'इ' आणि 'फ' या श्रेणीमध्ये होते आणि केवळ २ जणांना 'अ' श्रेणी व २० जणांना 'ब' श्रेणी मिळाली आहे. बहुसंख्य स्हणजे १२७, नगरसेवकांना 'सी' व 'डी' श्रेणी मिळालेल्या आहेत. समित्यांचे कामकाज कार्यक्षमपणे करून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ए, बी, सी, डी श्रेणीतील नगरसेवकांची संख्या वाढली पाहिजे आणि इ एफ श्रेणीमध्ये कोणीच नगरसेवक येता कामा नये.", असे संचालक मिलिंद म्हस्के यांनी म्हटले आहे.