मुंबई- मोदी सरकारचे तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. गरुवारी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांसोबत विज्ञान भवनात बैठक घेतली. मात्र, आठ तास चाललेली ही बैठक निष्फळ ठरली. मोदी सरकारने कृषी कायदे कसे साखरेच्या पाकात घोळून बाहेर काढले आहेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवले, पण शेतकरी नेते सरकारचे चहा-पाणी न पिता बैठकीतून निघून गेले, या सर्व प्रकरणावरून शिवसेनेने सामनातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणले असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारची कोंडी -
कडाक्याच्या थंडीतही पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घाम फोडला आहे. आंदोलन मागे घेण्याचे सोडाच ते अधिक जहाल आणि तीव्र होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना बदनाम करणाऱ्या आयटीसेलला ट्विटरने फटकारले आणि वास्तविकतेची जाणीव करून दिली. गेल्या सहा वर्षात सुपरमॅन मोदी सरकारची भयंकर कोंडी आणि फजिती कधीच झाली नव्हती. पंतप्रधान आणि गृहमंत्री कोणालाही झुकवू शकतात, हा गैरसमज पंजाबच्या शेतकऱ्यांनी खोटा ठरवल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
आंदोलनातील आज्जी आणि कंगना राणौत -
दुसरे प्रकरण मुंबईस पाकव्याप्त कश्मीर म्हणणाऱ्या भाजपच्या बेताल नटीचे. शेतकरी आंदोलनात भाग घेणाऱ्या एका वृद्ध ‘चाची’ला या नटीने शंभर रुपये रोजावर काम करणारी शाहीन बागवाली ‘आण्टी’ ठरवले. हे प्रकरणसुद्धा खोटे ठरले व त्या बेताल नटीला माघार घ्यावी लागली. एवढंच नव्हे तर त्या वृद्ध आजींनी या नटीला सुनावलेदेखील. ‘‘आपली १०० एकर जमीन आहे आणि या नटीने माझ्या शेतात काम करावे. मी तिला ६०० रुपये देते. तिने कापसाची एक गोणी उचलून दाखवावी,’’ अशा शब्दांत या आजींनी बेताल नटीला तिची जागा दाखवली. अशी अनेक प्रकरणे रोजच शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत घडत आहेत. सरकारच्या व भाजप सायबर फौजांच्या हातचलाख्यांचा भंडाफोड होत आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ या घोषणेचा फज्जा उडताना दिसत आहे, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.