मुंबई - 40 आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता पक्ष वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे सध्या रोज पदाधिकाऱ्यांच्या, शिवसैनिकांच्या बैठका घेत आहे. 'मातोश्री' तर कधी 'शिवसेना' भवनात या सर्व पदाधिकाऱ्यांची सध्या रोज रेलचेल सुरू आहे. या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षाला बळ देण्यासाठी मोर्चे बांधणी करत आहेत.
"तुम्हाला देण्यासारखं काही नाही" - आज ( 6 जुलै ) मातोश्रीवर पुण्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. 'मातोश्री'बाहेर या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी बाहेर येत या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "तुम्ही सर्व इतक्या मोठ्या संख्येने पुण्याहून मला भेटण्यासाठी मुंबईला आला आहे. मी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे. माझ्याकडे जे देण्यासारखं होतं ते मी त्यांना दिलं. आता त्यांनी ते सर्व घेऊन जे काय गुण उधळले हे तुम्ही सर्व बघतच आहात. आता तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही," असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी पुण्यातून आलेल्या शिवसैनिकांना ( Uddhav Thackeray Emotional Appeal Shivsainik ) केलं.
"शिवसेना आपलीच, कामाला लागा" - "तुमच्या ताकतीवर त्यांना सर्व दिलं ते निघून गेले. आता घेणारे निघून गेलेत आणि देणारे अजूनही माझ्यासोबत आहेत. शिवसेना आपलीच होती आणि आपलीच राहणार आहे. काळजी करू नका जोमाने कामाला लागा. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका," असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.