मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंडखोरी करून शिवसेनेच्या जवळपास 40 हून अधिक आमदारांना गुवाहाटीचे दर्शन घडवले. सध्या बंडखोर गट शिवसेनेवर दावा करत असला तरी सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या बंडखोर गटाला एक तर भाजप किंवा बच्चू कडू यांचे प्रहार संघटना अथवा राज ठाकरे यांच्या मनसेत विलीनीकरण व्हावं लागेल, असं बोललं जात आहे. त्यातच आज ( 6 जुलै ) बंडखोर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं या चर्चांना ( Sada Sarvankar Meets MNS Chief Raj Thackeray ) दुजोरा मिळत आहे.
"आशीर्वाद घेण्यासाठी भेट" - भेटीबाबात आमदार सदा सरवणकर म्हणाले, "राज ठाकरे हिंदू जननायक आहेत. त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीला पूरक असं धोरण राज ठाकरे यांनी घेतलेला आहे. याच उद्देशाने त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी मी राज ठाकरे यांची भेट घेतली."
भाजप मनसेच्या जोडीने वर्चस्व -आमदार सरवणकर ज्या माहीम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता आमदार सरवणकर यांनी बंडखोरी केल्याने भाजप व मनसेच्या जोडीने ते या भागात आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा आहेत.