मुंबई - दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान आणि येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्युत रोषणाई उजळणार आहे. या विद्युत रोषणाईचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आमदार निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, महापालिका सभागृह नेता विशाखा राऊत, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्वयंचलित रोषणाई -
महाराजांचा पुतळा दिव्यांनी उजळणार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर विद्युत रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण केले. तर, मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या पुरातन प्याऊचे लोकार्पण व कोनशिला अनावरण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री सर्व मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. मैदान परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघणाऱ्या परिसराचे अवलोकन करतानाच सर्व रोषणाई स्वयंचलित पद्धतीने व रंगीबेरंगी कशी संचालित होते, त्याची प्रत्यक्ष पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
एलईडी प्रोजेक्टर -
महाराजांचा पुतळा दिव्यांनी उजळणार शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा सन १९६६ मध्ये उभारण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर तसेच या मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात यावी, असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. पालिका जी/उत्तर विभागाने हा प्रकल्प उभारला असून आमदार निधीतून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्च केले आहेत. येथील रोषणाई स्वयंचलित व विविधरंगी म्हणजे रंग बदलत्या स्वरुपाची आहे. महाराजांच्या अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा, म्हणून विविध रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावले आहेत. पुतळ्याच्या चारही बाजुस जळती मशाल भासेल, अशारितीने दिवे बसविण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या साहित्याचा वापर -
पुतळ्याच्या आजुबाजूच्या पदपथाची शोभा वाढवण्यासाठी ४२ बहुरंगी एलईडी ग्लोब दिवे बसविले आहेत. बेंगाल क्लब परिसरातील धबधबा तसेच झाडांवर रंग बदलणारे एलईडी विद्युत दिवे लावले आहेत. मैदानाच्या पदपथास लागून सुशोभित असे २५ बोलार्डस लावले आहेत. मैदान परिसरातील ७ प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक भित्तीचित्रं, दीपस्तंभ आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळा या सर्व ठिकाणी एलईडी विद्युत दिवे लावले आहेत. दिव्यांसाठी इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागविले आहेत. या सर्व साहित्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे.
पुरातन प्याऊचा जीर्णोद्धार -
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील कबड्डी असोसिएशन येथे १०० वर्षांचा वास्तूवारसा असलेल्या पुरातन प्याऊचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येणारे खेळाडू तसेच परिसरात येणाऱ्या नागरिकांना पाणी पिण्याची सुविधा म्हणून ही प्याऊ उपयोगात येणार आहे. प्याऊमधून २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. प्याऊच्या जीर्णोद्धासह या सुविधेसाठी एकूण २० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.