मुंबई - शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. तुम्हाला जे उखाडायचं आहे. ते उखाडा मी घाबरत नाही, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांचा विरोधकांवर जोरदार हल्ला आम्ही कोणालाही घाबरत नाही. हिम्मत असेल तर समोरासमोर लढा, असे ते म्हणाले. ईडीची नोटीस म्हणजे ब्रह्वाक्य नाही, असेही ते म्हणाले. भाजपा विरोधकांना त्रास देण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर करत आहे. वैफल्य, हतबलता यातून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडी हा भाजपचा पोपट आहे, असेही ते म्हणाले.
सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही -
भाजपाने आणि ईडीने एकत्र कार्यालय टाकलयं का, असा सवाल त्यांनी केला. गेल्या एका वर्षापासून भाजपाचे काही नेते मला भेटतात. सरकार पाडण्यासाठी मला धमकावलं जात आहे. आमदारांच्या नावांची यादी दाखवून यांना केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेतील, अशी धमकी दिली जात आहे. ईडीने, सीबीआय, इन्कम टॅक्सने काय करायच ते करावं. दहशतवादी गँगही वापरा. मात्र, या सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे राऊत म्हणाले.
ईडी हा काही महत्वाचा विषय नाही -
आमच्यासाठी ईडी हा काही महत्वाचा विषय नाही. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स यांना कधी काळी महत्व प्राप्त झालं होतं. या तिन्ही संस्थामध्ये गांभीर्य आहे, असे वाटत होते. मात्र, आता ईडीची कारवाई म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं, हे लोकांनी गृहीत धरलं आहे. राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. म्हणून ही अशी हत्यारे वापरावी लागतात, असे राऊत म्हणाले.
10 वर्षांनंतर ईडीला जाग -
वर्षा राऊत यांनी घर घेण्यासाठी 50 लाखांचे कर्ज मैत्रिणीकडून घेतलं आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी 10 वर्षांनंतर ईडीला जाग आली आहे का, असा सवाल त्यांनी केला. तसेच आम्ही ईडीला कागदपत्रं वेळोवेळी पुरवली आहेत. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरावं लागेल. माझ्यासोबत पंगा घेऊ नका. मी नंगा आहे. मी जर तोंड उघडले, तुम्हाला देश सोडून जाऊ लागेल, असे राऊत म्हणाले.
बायकांच्या पदराआडून खेळी -
मुलांबाळावर हल्ले करणाऱ्यांना नामर्द म्हणतात. असा नामर्दपणा कोणी करत असेल. तर त्यांना शिवसेना त्याच पद्धतीने उत्तर देईल. बायकांच्या पदराआडून खेळी खेळण्यात येत आहे. ही खेळी त्यांच्यावर उलटणार आहे, असे राऊत म्हणाले. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आहे की मैदानात मुलांना बायकांना आणायचे नाही, असेही राऊत म्हणाले.
तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील -
भाजपाचे खाते खोला आणि त्यांना किती देणग्या मिळाल्या याची चौकशी करा. नीरव मोदी आणि विजय मल्या यांच्याबरोबरीने भाजप नेत्यांना उभं करीन, असे राऊत म्हणाले. भाजपाच्या 120 नेत्यांची माझ्याकडे यादी आहे. त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार, हे मला बघायचे आहे. भाजप नेत्याची एक वर्षात संपत्ती 1600 कोटीने वाढली त्याचे काय झाले. कायद्यासमोर कुणी मोठा नाही. मी जर तोंड उघडलं ,तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसेल, असे राऊत म्हणाले.
काय प्रकरण ?
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना देखील ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना 30 डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -LIVE : खासदार संजय राऊत शिवसेना भवनामध्ये दाखल, पत्रकार परिषद