मुंबई: देशभरातील अनेक राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत. पण अद्याप महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु झालेल्या नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप असल्याने अद्याप सर्व शाळा सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने आता सरकार सर्व शाळा सुरु करण्याच्या दिशेने विचार करत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात काय परिस्थिती आहे, ते पाहून पुढचे पाऊल, उचलण्यात येईल.
दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार?
कोरोनामुळे सुमारे दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्गाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्यात येत आहे. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच आढावा घेऊन अंतिम निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. कोरोनाची सद्यस्थिती परिस्थिती काय आहे, तिसऱ्या लाटेचे काही संकेत आहेत का, 2 ऑक्टोबरपर्यंत काय परिस्थिती असेल ते बघायचे आहे. त्यानंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो का, यावर चर्चा होईल, विचार होईल. तसेच टास्क फोर्सच्या सदस्यांची मते विचारात घेतली जातील, असे पवार म्हणाले.