महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'तुम्हालाच मागील दाराने आणीबाणी आणायची आहे'

तुमच्याच मनात आणीबाणी आहे. तुम्हीच मागच्या दाराने देशात आणीबाणी आणण्याचा प्रयत्न करत आहात, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे.

raut
raut

By

Published : Dec 15, 2020, 12:45 PM IST

Updated : Dec 15, 2020, 1:25 PM IST

मुंबई -आणीबाणीत हेच सुरू होते ना, इंदिरा गांधींच्या काळातसुद्धा काँग्रेसवाले म्हणत होते, की आंदोलन करणारे विरोधक हे देशद्रोही आहेत. आज तुम्हीदेखील तेच म्हणत आहात. तुमच्याच मनात आणीबाणी आहे. तुम्हीच मागच्या दाराने देशात आणीबाणी आणण्याचा प्रयत्न करत आहात, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे.

'राहुल गांधींची भावना देशाची'

राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले, ती त्यांची भावना नसून ती देशाची भावना आहे. विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तर तुम्ही त्यांना देशद्रोही म्हणता, शेतकऱ्यांनी आवाज उठवला तर त्यांना खलिस्तानी बोलता. या शेतकऱ्यांमधील घरातील अनेक मुले सैन्यामध्ये आहेत. आज आंदोलनाला बसले आहेत, त्यातील अनेकजण सैन्यामध्ये होते. आम्ही जर एखादा विषयवर बोललो तर आम्ही देशद्रोही आहोत, आमची पाकिस्तानशी हातमिळवणी आहे, शेतकरी चीनकडून पैसे घेतात, असे भाजपा बोलत आहे. आणीबाणीतही हेच होत होते. यामुळे यांनादेखील मागच्या दरवाजाने आणीबाणी लागू करायची आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

'त्यावेळी तो भ्रमात नसतो?'

या देशातील शेतकरी हा जागृत शेतकरी आहे. हा पंजाब-हरयाणाचा शेतकरी तुम्हाला मतदान करतो. तुम्हाला निवडून आणतो, तुमची सरकारे स्थापन करतो, त्यावेळी तो कोणत्या भ्रमात नसतो, त्यावेळी तो तुमचा असतो. जेव्हा तो त्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतो, तेव्हा तुम्ही त्याला भ्रम निर्माण करतोय, असे आता म्हणत आहात हे वागणे दुतोंडी आहे.

'आरक्षणासंदर्भात न्याय निर्णय घेण्यासाठी सक्षम'

महाविकास आघाडी सरकार आरक्षणासंदर्भात न्याय निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. कायद्याच्या चौकटीत राहून घटनेच्या चौकटीत राहून समाजातील प्रत्येक घटकाला कोणावरही अन्याय होणार नाही त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी थोडी आपली मानसिकता बदलायला हवी. अनेकवेळा स्थगिती देणे, स्थगिती न उठवणे यामागे काही वेगळी भूमिका आहे का, हे आम्हाला समजून घ्यायचे आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 15, 2020, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details