मुंबई - ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. रियासोबतच सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल परिहारयांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला.
सुशांतसिंह राजपूत प्रकरण : रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर; शोविकची कोठडी वाढली रियाला एक लाख आणि अन्य दोघांना 50 हजारांच्या जातमुचकल्यावर हा जामीन मंजूर झालाय. पुढील दहा दिवस रियाला पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पासपोर्ट आणि अन्य कागदपत्र न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय तिला विदेशी प्रवास करणे किंवा बृहन्मुंबईच्या बाहेर जाता येणार नाहीय.
मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस.व्ही. कोतवाल यांनी मंगळवारी रिया चक्रवर्ती, शोक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मंगळवारी राखून ठेवला. यावर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर एनसीबीकडून तपास सुरू आहे. याच प्रकरणी चौकशीनंतर सर्वांना अटक झाली. सुशांतनेही ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने केला आहे.
विशेष एनडीपीएस कोर्टाने मुंबईच्या जामीन फेटाळल्यानंतर रिया व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचे सांगत रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. यानंतर न्यायालयात खटला उभा राहिला. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला सीबीआयकडे दिल्यानंतर या प्रकरणात तपासादरम्यान ड्रग्ज पॅडलर्सचे रॅकेट उघडकीस आले. रियाकडे देखील अंमली पदार्थ सापडल्याचा आरोप झाला. तसेच सुशांतलाही ड्रग्जचे सेवन करण्याची सवय असल्यासंबंधी चौकशी सुरू आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने यासंबंधी तापासाची चक्रे गतीने फिरवत अनेकांना चौकशीसाठी बोलावले.
या प्रकरणात दीपिका पदुकोणसह आणखी काही नावे समोर आली. मागील तारखेला न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि अन्य संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती. अखेर आज रियाला जामीन मंजूर झाला आहे.
सत्यमेव जयते!
रिया चक्रवर्ती यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे वकील यांनी मत व्यक्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने आम्हाला आनंद झाल्याची भावना रियाचे वकील सतीश माने-शिंदे यांनी व्यक्त केली. सत्य आणि न्याय यावर विजय आहे, आणि शेवटी न्यायाधीश सारंग व्ही. कोतवाल यांनी वस्तुस्थिती आणि कायद्यांवरील सबमिशन स्वीकारले. रियाला अटक करणे आणि ताब्यात देणे पूर्णपणे अनधिकृत व कायद्याच्या आवाक्याबाहेरचे होते. मात्र, आम्ही सत्यासाठी कटिबद्ध आहोत. सत्यमेव जयते, असे ते म्हणाले.