मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या जिल्ह्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावर अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या सुटा-बुटावर मलिक यांनी टिप्पणी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना आमचे बुट पाहण्यापेक्षा तुम्ही कोकणात जाऊन मदत करावी, अन्यथा कोकणची जनता तुम्हाला कोल्हापुरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.
'..तर कोकणातील जनता तुम्हाला कोल्हापुरी दाखवल्याशिवाय राहणार नाही'
नवाब मलिकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमचे बुट पाहण्यापेक्षा तुम्ही कोकणात जाऊन मदत करावी, अन्यथा कोकणची जनता तुम्हाला कोल्हापुरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांचा तीन तासाचा देखावा -
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सिंधुदुर्गातील नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर प्रविण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत या दौऱ्यांची सविस्तर माहिती दिली. यादरम्यान विरोधी पक्षनेते तीन दिवस कोकणवासीयांच्या बांधावर उंबरठ्यावर जाऊन विचारपूस केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन तास दौरा करून देखावा दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच राज्य सरकार नुकसानग्रस्त भागात मदत करण्यापेक्षा केंद्राकडे बोट दाखवण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. महाराष्ट्रात का आले नाहीत? असा सवाल काही मंत्र्याकडून सतत करण्यात येत आहे. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले ? वादळाचा फटका रायगड, पालघर, सातारा जिल्ह्याला बसला असून मुख्यमंत्री तिकडे का गेले नाहीत ? असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थिती केला आहे.
कोकणच्या जनतेने सातत्याने शिवसेनेला पाठबळ दिले आहे. त्या अनुषंगाने कोकणचा भरीव विकास होईल, अशी कोकणवासीयांची अपेक्षा होती. मात्र कोकणच्या जनतेच्या अपेक्षा मातीत घालण्याचं काम ह्या महाविकास आघाडी सरकारने केले आहे. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारने मदत जाहीर केली होती. परंतु ती अद्याप कोकणवासीयांपर्यंत पोहोचली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेंट करण्यात व्यस्त आहेत. पण नुकसानग्रस्त भागात मदतीचा दुष्काळ मात्र त्यांना दिसत नाही. कोकणातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. महाविकास आघाडी सरकारला नक्कीच कोकणातील जनता धडा शिकवले, असे सुद्धा प्रविण दरकेरांनी सांगितले.