मुंबई - पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत ( sanjay raut ) यांची भेट घेण्यास एक खासदार आणि दोन आमदारांना तुरुंग प्रशासनाने बुधवारी मनाई केली. नियमावलीनुसार कोणालाही कैद्याला भेटण्यास दिले जात नसल्याचे सांगत केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांना भेटता येते, असे कारण तुरुंग प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. मात्र, संजय राऊतांना भेटण्यासाठी आलेल्या राजकारण्यांना न्यायालयाचे आदेश किंवा परवानगी मिळाल्यावर भेट होऊ शकते, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिली आहे.
जाळीतूनच इतर कैद्यांप्रमाणे भेटता येईल - पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर संजय राऊत यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवसेनेचे एक खासदार आणि दोन आमदार तसेच त्यांचा भाऊ सुनील राऊत हे संजय राऊत यांना भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेले होते. सर्वांनी मिळून संजय राऊत यांना तुरुंग अधीक्षकांच्या कार्यालयात भेटण्याची परवानगी मागितली. परंतु, अशा प्रकरची भेट देण्यास तुरुंग अधीक्षकांनी नकार दिला होता. संजय राऊत जरी खासदार असले तरी तुरुंगात त्यांना इतर कैदी आणि नियमावलीप्रमाणेच वागणूक दिली जाईल, असे सांगण्यात आले. विशेष भेट हवी असल्यास न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याचेही तुरुंग प्रशासनाने सांगितले. सध्यातरी संजय राऊत यांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला जाळीतूनच इतर कैद्यांप्रमाणे भेटता येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.