ठाणे -9 एप्रिल रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या ( Raj Thackeray Rally In Thane ) सभेसाठी पोलिसांनी अखेर परवानगी ( Police Granted Permission For Raj Thackeay Rally ) दिली आहे. ठाण्यातील संत गजानन चौकात अखेर ही सभा होणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेने गडकरी रंगायतन समोरच्या जागेची मागणी केली होती. मात्र, चैत्र नवरात्रोत्सवामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसेच सभेसाठी पर्यायी जागेचा विचार करावा, असे आवाहन केले केले होते. त्यानंतर आज सकाळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर पोलीस अतिरीक्त आयुक्त, सहायक आयुक्त आणि पोलीस प्रशासनासोबत सभेसाठी जागा पाहणी दौरा करण्यात आला. त्यानंतर मनसे नेत्यांच्या पाठपुराव्याने ठाण्यातील संत गजानन चौकात अखेर सभेला परवानगी देण्यात आली.
बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला टोला -दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर टीका करत 25 वर्ष सत्ता असून देखील एक मैदान ठेवू शकले नाहीत 25 वर्षे सत्ता काय कामाची, असे म्हणत सत्ताधारी शिवसेनेला टोला लगावला. 9 तारखेच्या सभेमध्ये सर्वच नेत्यांना मंत्र्यांना आणि राज्य सरकारला राज ठाकरे यांचे हे उत्तर देणार असून ही उत्तर देण्यासाठी खास सभा असल्याचेदेखील ते म्हणाले.