मुंबई - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही. हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे, अशी आग्रही मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडली.
राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत, असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल, असेही ते म्हणाले.
चाचण्यांचा वेग चांगला-
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के एंटिजेन होतात जे की समाधानकरक असले तरी वाढवावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितले.
सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली-
गेल्या वर्ष सव्वा वर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढत आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रात तर आधीच तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामूळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आरटीपीसीआर चाचण्या ७० टक्यांपेक्षा जास्त करुन व लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू असे सांगितले. मात्र त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
मागणीनुसार लस पुरवठा लगेच व्हावा-
मुख्यमंत्री म्हणाले की, प्राधान्यक्रम गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत ९२ ते ९५ लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली आहेत.