राज्यात 'या' तारखेपर्यंत शंभर टक्के लसीकरणाचे मुख्यमंत्र्यांचे उद्दीष्ट, आज पंतप्रधान घेणार आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी राज्यातील लसीकरणाचा आढावा घेणार आहेत. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीकवर उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शंभर टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट दिले आहे.
मुंबई - कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के नागरिकांना एक डोसची मात्रा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली असून यात लसीकरण स्थितीचा ते आढावा घेणार आहे. दुपारी बारा वाजता दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीला सुरुवात होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
९ कोटी नागरिकांचे लसीकरण
राज्यातील ९ कोटी ८५ लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधकात्मक लसींची डोस घेतले आहेत. ६ कोटी ७३ लाख ९० हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ३ कोटी ११ लाख ४३ हजार नागरिकांनी दुसऱ्या डोसची मात्रा घेतल्याचा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा दावा आहे. देशात लसीकरणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश टॉपवर आहे. महाराष्ट्रातही लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यासाठी डोसची मात्राही उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील लसीकरण स्थितीचा आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत. देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमणाचा वेग कमी झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. राज्यातील जीवन पूर्वपदावर आले आहेत. दुकाने, बाजारपेठा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला वेळ वाढवून दिली आहे. सिनेमागृह, नाट्यगृह 50 टक्केच्या प्रमाणात सुरू झाली आहेत. लसींचे दोन डोस घेतलेल्यांना तिकीट काढून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. विद्यालय, महाविद्यालय, कृषी विद्यालय सुरू केली आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्यालय प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
नागरीकांनी बेफिकीर होऊ नये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, सुरुवातीला कोविडची भीती होती. पण आता कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी चाचणीचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या आहेत. त्याचा वापर करायला हवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणबाबत संदेश दाखविण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.