मुंबई -कोरानाच्या पार्श्वभूमिवर यंदा २१ जुलै रोजी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्याबाबत विशेष नियमावली गृह विभागाने जारी केली आहे. त्यावर कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, यावर भर दिला जात आहे. पण या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नियमभंगाकडे पेटाने ( प्राण्यांचे संरक्षण करणारी एक संस्था) लक्ष वेधले आहे. हे अतिशय गंभीर असल्याचे निरिक्षण पेटाने नोंदवले आहे. बकऱ्यांचे बेकायदा कत्तलखाने आणि वाहतुकीला पेटाने विरोध केला आहे. तसेच विक्री करताना कोविडबाबतचे निर्बंध देखील पाळण्यात येत नसल्याचे पेटाचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे ताबडतोब लक्ष देऊन दोषी लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पेटाने केले सर्व्हेक्षण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सर्वच सणांसाठी विशेष नियमावली तयार केल्या जात आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, राज्य शासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. याच अनुशंगाने ईदसाठी शासनाने निर्बंध जारी केल्यानंतर पेटाने याबाबत सर्व्हेक्षण केले. त्यात शासनाने तयार केलेल्या नियमांना हरताळ फासत बकऱ्यांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. बकरी ईद निमित्त विशेष परिपत्रक तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील परिस्थिती पाहाता सक्रिय पशु बाजारपेठा बंद ठेवणे व जनावरांच्या खरेदीला केवळ ऑनलाइन किंवा टेलिफोनद्वारे परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पेटाचे म्हणणे आहे.
बकऱ्यांचे बेकायदेशीर कत्तलखानेवरून पेटाचा आक्षेप 'या' विभागाकडे केली पेटाने तक्रार
पेटाच्या सर्व्हेक्षणात प्रामुख्याने अनेक ठिकाणांची नावे पुढे आली आहे. यात मुंबईतील अंधेरी, भायखळा, गोवंडी, जोगेश्वरी, कुर्ला आणि मानखुर्दमधील 23 तत्पुरत्या आणि बेकायदा बकरी बाजारांचा समावेश आहे. याशिवाय या यादीत महाराष्ट्राबरोबरच आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमधून सुमारे 1 लाख बकऱ्या बलिदानासाठी विकल्या गेल्या असल्याचे पेटा इंडियाच्या निदर्शनास आले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांच्या कत्तली होतात. याच होणाऱ्या कत्तली बाबत पेटाने कायदेशीर बाब मांडली आहे. बकरे विक्रीत क्रुएल्टी टू अॅनिमल (पीसीए) कायदा, प्राणी वाहतूक नियम, कोविड प्रोटोकॉलचे सर्रास उल्लंघन होत आहे, असा पेटाचा आरोप आहे. हा आरोप पेटाने सर्व्हेक्षणाच्या आधारावर केला आहे. शिवाय याच सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार पेटाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिका आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत पत्रे लिहून तक्रार केली आहे.
...तर पालिका करणार कारवाई
यासंदर्भात माहिती देताना देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांनी सांगितले, की मुंबईमध्ये उद्या (बुधवारी) बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी बकरी ईदला सामान्य: परिस्थिती असते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृह येथे २१ ते २३ जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी म्हैस व रेडे या प्राण्यांची कुर्बानी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरा बाजार देवनार पशु वधगृहात भरवण्यात आलेला नाही. इतर ठिकाणी बेकायदेशीर बाजार भरवला असेल, तर त्यावर पालिकेचा बाजार विभाग कारवाई करतो.
हेही वाचा -डान्सबारमधील 'छमछम'ला अभय देणे भोवले; दोन पोलीस निरीक्षक निलंबित तर सहाय्यक आयुक्तांची उचलबांडी