मुंबई - राज्य अनलॉकच्या दिशेने जात असताना बार आणि रेस्टॉरंट यांना सशर्त अटींवर तुम्ही परवानगी देत आहात. तर, धार्मिक कार्यासाठी परवानगी का दिली जात नाही?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला केला. तसेच न्यायालयाने जैन धर्मातील आयबील ओली या उत्सवासाठी जैन मंदिरातील डायनिंग हॉल उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
श्री ट्रस्टी आत्म कमल लाब्दीसुरेश्वरजी जैन ज्ञान मंदिर ट्रस्ट यांच्याकडून उच्च न्यायालयातयाचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत 23 ते 31 ऑक्टोबर दरम्यान जैन मंदिरातील डायनिंग हॉल उघडण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना राज्य सरकारकडून यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते.
मुंबईतील 48 जैन मंदिरातील डायनिंग हॉल खुले करण्यास परवानगी
मुंबई उच्च न्यायालयाने जैन धर्मातील आयबील ओली या उत्सवासाठी जैन मंदिरातील डायनिंग हॉल उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. श्री ट्रस्टी आत्म कमल लाब्दीसुरेश्वरजी जैन ज्ञान मंदिर ट्रस्ट यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती.
या प्रतिज्ञापत्रात जैन मंदिर खुले करण्यास विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र राज्यात तुम्ही बार आणि रेस्टॉरंटला सशर्त अटींवर परवानगी देत आहात. तर, पवित्र धार्मिक कार्यासाठी डायनिंग हॉल उघडण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे? असा सवाल न्यायालयाने राज्य शासनाला विचारला आहे. तसेच मुंबई शहरात असलेल्या 48 जैन मंदिरांना येत्या 23 ते 31 ऑक्टोबर या 9 दिवसांसाठी डायनिंग हॉल खुले करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी राज्य शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.