मुंबई - आज जगभर महिला दिन उत्साहात साजरा होत असताना राज्य सरकारने राज्यातील महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे. महिला ग्राहकांना मुद्रांक शुल्क दरात 1 टक्के सवलत देण्यात आली आहे. हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हणत आता घरखरेदी करणाऱ्या महिलाचा टक्का प्रचंड वाढेल असे म्हणत बांधकाम क्षेत्राने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर 1 टक्के सवलत मिळणार असल्याने घरविक्री ही वाढेल आणि याचा फायदा बांधकाम क्षेत्राला ही होईल असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -राज्य अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्रासाठी ७,५०० कोटींची तरतूद
महिला ग्राहकांचा टक्का आतापर्यंत कमीच?
मागील काही वर्षात महिलानी शिक्षणात आघाडी घेतली आहे. तर शिकून सर्वच क्षेत्रात महिला काम करताना दिसत आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेल्या महिला आता कुठे घर खरेदीसारख्या महत्वाच्या व्यवहारात सहभागी होताना दिसत आहेत. मुळात मालमत्ता, घर खरेदी म्हटली की भारतीय मानसिकतेनुसार घरच्या पुरुषालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे प्रामुख्याने घरखरेदी, मालमत्ता खरेदी ही पुरुषांच्याच नावे होते. मागील 5-10 वर्षात हे चित्र बदलू लागल्याची माहिती आनंद गुप्ता, अध्यक्ष, रेरा कमिटी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिली आहे. घरविक्री करण्यासाठी आता महिला पुढे येऊ लागल्या आहेत. पण तरीही महिला ग्राहकांचा टक्का तसा आज ही कमीच आहे. 25 ते 30 टक्के महिला ग्राहक दिसतात असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -महा अर्थसंकल्प २०२१ : सांस्कृतिक कार्य विभागास 161 कोटी रुपयांची तरतूद
आता मात्र टक्का वाढणार
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महत्वाची अर्थसंकल्पयीय तरतूद जाहीर केले आहे. ती म्हणजे आता महिला घर खरेदीदारांना मुद्रांक शुल्क दरात 1 टक्क्यांची सूट मिळणार आहे. 1 एप्रिल पासून ही सवलत लागू होणार आहे. राजमाता जिजाऊ गृहस्वामीनी योजनेअंतर्गत ही सवलत लागू करण्यात आली आहे. कॊरोनाच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्क दरात देण्यात आलेली सवलत 1 एप्रिलपासून बंद होणार आहे. तेव्हा 1 एप्रिलपासून 5 टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. मात्र 1 एप्रिलपासून महिला ग्राहकांकडून 4 टक्के दराने मुद्रांक शुल्क वसूल केले जाणार आहे. ही महिला ग्राहकांसाठी दिलासादायक बाब असणार आहेच. पण त्याचवेळी ही सवलत महत्वाची ठरणार असल्याने घरातील महिलांच्या नावे घरखरेदी करण्यास सुरवात होईल. ही खूप मोठी दिलासादायक बाब असेल. तेव्हा हा निर्णय स्वागतार्ह असून आता महिला ग्राहकांचा टक्का दुपटीने वाढेल असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
सवलतीसाठी का होईना पण लोकांची मानसिकता आता बदलणार?
घर वा मालमत्ता खरेदी म्हटली की ती पुरुषांच्याच नावाने होते. आर्थिक दृष्ट्या स्त्रिया सक्षम झाल्या असल्या तरी घर आणि मालमत्ता खरेदीत स्त्रियाची टक्के वारी खुपच कमी आहे. पण आजचा राज्य सरकारचा महिला ग्राहकांना मुद्रांक शुल्क दरात 1 टक्के सवलत देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरेल अशी प्रतिक्रिया डॉ जितेंद्र खेर, व्यवस्थापकीय संचालक, माऊंटन रेंज समूह यांनी दिली आहे. अनेक बँका महिलांना स्वस्त गृहकर्ज उपलब्ध करून देते. तर आता मुद्रांक शुल्क दरात 1 टक्के सवलत मिळणार आहे. तेव्हा या दोन्ही सवलतीचा लाभ घेत घर खरेदी केल्यास मोठी रक्कम वाचत असेल तर नक्कीच महिलांच्या नावे घर खरेदी करण्याकडे लोकं वळतील, लोकांची मानसिकता बदलेल असा विश्वास ही डॉ खेर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -जाणून घ्या, राज्याच्या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्राला काय मिळणार?