मुंबई - राज्यात अचानक वाढलेल्या थंडीने नागरिक गारठले आहेत. त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत असून सातपुड्याच्या डोंगररांगात तर थंडीने कहरच केला आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, आदी शहरांसह नंदुरबारच्या सातपुड्यातही थंडीची लाट कायम आहे. त्यामुळे नागरिक गारठले आहेत.
नंदुरबार
नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात पारा 5 अंशावर आला आहे. नंदुरबार शहरात 11 अंश इतके तापमान नोंदविण्यात आले असून सर्वात कमी तापमान थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात नोंदविण्यात आले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शीत लहरींचा प्रभाव जाणवत आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. दिवसाही गारठा जाणवत आहे. तर रात्री नागरिकांना थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.
महाबळेश्वर गारठले, पारा शून्य अंशावर
सातारा - राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य अंश सेल्सियसवर गेले आहे. आज पहाटे परिसरात अनेक ठिकाणी बर्फाची चादर पसरलेली असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
जिल्ह्यातील सर्व भागात रात्रीपासून कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. अनेक भागात पारा कमी झालेला आहे. आज सकाळी महाबळेश्वरमधील तापमानात कमालीची घट झाली. दवबिंदू गोठल्याने स्ट्रॉबेरीच्या पानावरती बर्फ तयार झाला.