मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली होती. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेने ‘ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज भासल्यास विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी पालिका २१ कोटी रुपये खर्च करणार आहे.
पालिका लागली कामाला
मुंबईत कोरोनाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले असले तरी त्याचा धोका अद्याप कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत झपाट्याने रुग्ण वाढले होते. यावेळी खाटा, ऑक्सिजन, वेंटिलेटरची कमतरता भासली. काही रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागले होते. वाढत्या रुग्णांचा ताण पालिकेच्या आरोग्य सेवेवर आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत यंत्रणा कमी पडू नये यासाठी पालिका सज्ज झाली आहे. विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिका कामाला लागली आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या दूर होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचे सूतोवाच केले होते. खासदार राहुल शेवाळे यांनी आरसीएफ, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएआरसी यांसारख्या आस्थापनांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आरसीएफ कंपनीच्या सीएसआर निधीतून गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट उभारण्यात आले. शताब्दीसह पूर्व उपनगरातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.