मुंबई -बेकायदेशीर संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Workers) महामंडळाकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाई केली. अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करून बडतर्फ करण्यात आले होते. तर रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली होती. आतापर्यत परिवहन मंत्र्यांनी दोन वेळा कामावर येण्याची संधी दिली होती. या दिलेल्या संधीच्या काळात जे कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना महामंडळाने पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधित आदेशसुद्धा काढण्यात आले आहेत.
गेल्या 77 दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेले आहेत. नियमबाह्य आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे ज्या कर्मचा-यांची सेवासमाप्त करण्यात आली आहे, त्यांच्याबाबत कायदेशीर प्रक्रियेचे अनुपालन करुन सेवासमाप्ती मागे घेण्याबाबत सुचना एसटी महामंडळ प्रशासनाने दिल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेळोवेळी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देऊन जे कर्मचारी विहीत मुदतीत हजर झालेले आहेत, त्यांच्याबाबत सेवासमाप्तीची केलेली कार्यवाही रद्द करण्यात येऊन त्यांना सेवासमाप्तीवेळी अदा करण्यात आलेले एक महिन्याचे वेतन एकरकमी वसूल करण्यात यावे. तरी उपरोक्त सुचनांची तात्काळ काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
- शुक्रवारी २२८ एसटी कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ-
महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात दिली आहे. तरी सुद्धा एसटी कर्मचारी संपावर ठाम आहे. महामंडळाने आतापर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. याशिवाय महामंडळाने आतापर्यत ३ हजार ६७९ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे. आज एसटी महामंडळाने तब्बल २२८ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केली असून आतापर्यतची सर्वाधिक मोठी कारवाई असल्याचे बोलण्यात येत आहे.