मुंबई- टोलनाक्यांवर नवीन चारचाकी वाहनांना फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले आहे. तरी फास्टटॅग मार्गिकेत विना फास्टटॅग घुसणार असेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. ही माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.
फास्टटॅगच्या रांगेत विना फास्टटॅग घुसणे पडणार महागात; 'हा' नियम लागू
टोलनाक्यांवरील स्वतंत्र मार्गिकेमध्ये विना फास्टटॅग वाहनधारक अनेकदा घुसतात. त्यामुळे फास्टटॅग धारक आणि टोल कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. ही बाब लक्षात घेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे टोल नाक्यावरील फास्टटॅग मार्गिकेत विना फास्टटॅग घुसणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
टोलनाक्यांवरील स्वतंत्र मार्गिकेमध्ये विना फास्टटॅग वाहनधारक अनेकदा घुसतात. त्यामुळे फास्टटॅग धारक आणि टोल कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. ही बाब लक्षात घेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे टोल नाक्यावरील फास्टटॅग मार्गिकेत विना फास्टटॅग घुसणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. अशा वाहनचालकांना दुप्पट टोल आकारला जात आहे. तर राज्यभरातील अशा वाहनचालकांना अशी 'घुसखोरी' आता महागात पडणार आहे. कारण मुंबई वगळता राज्यभरातील टोल नाक्यावरही आता अशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कमलाकर फंड, मुख्य व्यवस्थापकीय संचालक (टोल) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
फास्टटॅग म्हणजे काय?
टोल नाक्यावरील गर्दी-रांग कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी केंद्र सरकारने फास्टटॅग ही पद्धती पुढे आणली. फास्टटॅग हे एक स्टिकर असून ते गाडीच्या समोरील बाजूला लावले जाते. या स्टिकर असणाऱ्या आरएफआयडी मार्फत टोलचे पैसे भरता येतात. तर वाहनचालकांचे बँक खाते या फास्टटॅगशी जोडलेले असते. त्यामुळे काही सेकंदात टोल भरणे सहज शक्य होत आहे. नव्या सर्व चारचाकी वाहनांना फास्टटॅग बंधनकारक करण्यात आले आहे. तर फास्टटॅग असणाऱ्या गाड्यांसाठी दोन-दोन स्वतंत्र मार्गिका अनेक टोलनाक्यावर तयार करण्यात आल्या आहेत.
फास्टटॅगच्या मार्गिकेत विना फास्टटॅग वाहनधारकांची घुसखोरी
फास्टटॅगसाठीच्या मार्गिकेतून फास्टटॅग असणाऱ्यांनाच प्रवेश आहे. तर विना फास्टटॅग या मार्गिकेत घुसणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. म्हणजेच अशांना दुप्पट दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र, या तरतुदीची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नव्हती. त्यामुळे अशी घुसखोरी वाढल्याने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची आणि फास्टटॅग धारक वाहनचालकांची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे एमएसआरडीसीने या तरतुदीची अंमलबजावणी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. फंड यांनी दिलेल्या माहितीनुसार या 15 दिवसांच्या कालावधीत 'अशा' 3 हजाराहून अधिक वाहनांवर कारवाई करत दुप्पट टोल वसूल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
इतर ठिकाणीही दंडात्मक कारवाई
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर या तरतुदीची कडक अंमलबजावणी केल्याने फायदा होत आहे. त्यामुळे मुंबई वगळता राज्यभरातील सर्व टोलनाक्यावर अशी कारवाई सुरू करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू असल्याचे फंड यांनी सांगितले आहे. त्यामुळे फास्टटॅगच्या मार्गिकेत घुसणे तोट्याचे ठरणार आहे.