मुंबई - मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी एक विनायक शिंदे याच्या कळवा येथील घरामधून राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेल्या डायरीमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विनायक शिंदेच्या घरात डायरी मिळाली असून, त्यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी अॅड धनराज वंजारी बार, क्लब व हुक्का पार्लरच्या आकाराप्रमाणे केली जायची हप्ता वसुली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक शिंदेच्या चौकशीमधून अनेक पैशांचे व्यवहार हे समोर आले आहेत. विनायक शिंदेच्या घरात जी डायरी मिळाली होती त्यामध्ये कोड वर्डमध्ये बारची नावं, पैशांचा आकडा व संबंधित व्यक्तीची नावं लिहिण्यात आली आहेत. बार किंवा क्लबच्या आकाराप्रमाणे एक लाखापासून अधिकची वसुली दर महिन्याला केली जात होती. ही वसुली विनायक शिंदे हा स्वतः करत होता. सचिन वाझेच्या दबावामुळे सदरच्या 30 बार, क्लबकडून ही वसुली केली जात होती. यासाठी विनायक शिंदे याला सचिन वाझेने दर महिन्याला कमिशन तत्वावर नेमले असल्याचेही राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासातून समोर आले आहे.
या कारणांमुळे ठरवायचा सचिन वाझे हफ्ता
विहित वेळेनुसार अधिक वेळ चालू ठेवण्यात येणाऱ्या बार, क्लब, हुक्का पार्लरवर सचिन वाझे हा नजर ठेवून कारवाईची धमकी देत होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील हे बार, क्लब असल्याचं समोर आले आहे. छोट्या बार चालकांकडून दर महिन्याला 1 लाख रुपये तर मोठमोठ्या क्लब व इतर बार रेस्टॉरंटकडून महिन्याला 4 ते 5 लाख रुपयांचा हप्ता वसूल केला जात असल्याचेही आतापर्यंत समोर आले आहे.
हेही वाचा -रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उध्दव ठाकरेंना फोन
सचिन वाझे देत होता कारवाईची धमकी
राष्ट्रीय तपास यंत्रणा या डायरीतील मजकुराचा तपास करत असून, विनायक शिंदेकडून महत्त्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 30 बार, क्लब, हुक्का पार्लरकडून मिळालेला पैसा कशाप्रकारे वाटला जात होता? यामध्ये सचिन वाझेसह तर कोणी इतर अधिकारी सहभागी आहे का? याचाही तपास केला जात आहे. 2007 लखनभैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला बडतर्फ पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हा सचिन वाझे याच्या जवळचा मानला जात होता. गेले वर्षभर पेरोलवर सुटून आल्यानंतर सचिन वाझेसाठी विनायक शिंदे अशा प्रकारच्या वसुलीचे काम करत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मुंबईतील काही बियर बार, हुक्का पार्लर व क्लब चालकांची चौकशी करण्यात आली आहे. आहार संघटनेचे प्रमुख सदानंद शेट्टी यांनी मात्र त्यांच्या संघटनेच्या कुठल्याही सदस्याने अशा प्रकारची कुठलीही हप्ते खोरीची तक्रार केलेली नसून, अशा प्रकारच्या येणाऱ्या तक्रारींसाठी आहारकडून प्रशासकीय स्तरावर तक्रार करून प्रश्न सोडवले जातात, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलीस खात्यातील माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी वकील धनराज वंजारी यांच्या मतानुसार क्लब, बार व हुक्का पार्लरकडून हप्ता घेण्याचे प्रकरण हे अतिशय गंभीर असून पोलीस खात्यातून एक निलंबित अधिकारी तर दुसरा बडतर्फ अधिकारी अशा दोघांकडून अशा प्रकारच्या गोष्टी होणे हे खूपच गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने विनायक शिंदेकडे मिळालेल्या डायरीचा सखोल तपास करून लोकांसमोर सत्य आणावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
हेही वाचा -छोट्या बचत योजनांबाबत केंद्र सरकारने केले 'एप्रिल फूल'; व्याजदर कमी करण्याचा आदेश मागे