मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यात वाढ होऊन आज सलग चौथ्या दिवशी २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज २०५४ रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ५८७ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७१ रुग्ण ऑक्सिजनवर, ९७ रुग्ण आयसीयूमध्ये तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
१४.३४ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार ३४५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २०५४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १४.३४ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. १७४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ९२ हजार ५५७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५९ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार ६१३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३८९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१७४ टक्के इतका आहे.
२ पुरुषांचा मृत्यू -मुंबईत आज कोरोनामुळे २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला एक व्यक्ती ९० वर्षाचा पुरुष असून त्याला मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार होते. दुसरा रुग्ण ५४ वर्षाचा असून त्याची किडणी निकामी झाली असून उच्च रक्तदाब हे आजार होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.