मुंबई- देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणा-या आणि दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर दातांवर उपचार करणाऱ्या नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सोयी-सुविधा विषयक कामगिरीची दखल नुकतीच २ राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे. या अंतर्गत ‘आऊटलुक’ साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्ये ३ रे स्थान देत आपल्या महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. तर ‘द वीक’ या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर दंत महाविद्यालयाला ५ वे स्थान दिले आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी नायर दंत महाविद्यालयाच्या सर्व चमुचे अभिनंदन केले आहे.
सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर -
एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील २ वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याने नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीसह तेथील सुविधांचा देखील राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असल्याचे नमूद करीत नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी या बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मार्च २०२० पासून उद्भवलेल्या कोविड काळात नायर दंत महाविद्यालय आणि दंत रुग्णालय अव्याहतपणे कार्यरत आहे. कोविड सारख्या साथरोगाच्या परिस्थितीत दंत वैद्यकीय सेवा देताना साथरोगाचा संसर्ग होऊ नये, या दृष्टीने आत्यंतिक काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, हे आव्हान नायर दंत महाविद्यालयातील विद्यार्थी-कामगार–कर्मचारी- अधिकारी आणि प्राध्यापक व शिक्षक मंडळी समर्थपणे हाताळत आहेत. अधिकाधिक नाविन्यपूर्ण व गुणवत्तेला प्राधान्य देणा-या सेवांचा नियमितपणे विस्तार करणाऱ्या नायर दंत महाविद्यालयात एकावेळी ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी दंत वैद्यकीय बाबींचे शिक्षण घेत असतात. यामध्ये ५ वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि ३ वर्षीय पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी ५७ प्राध्यापक (शिक्षक) या महाविद्यालयात कार्यरत आहेत. या महाविद्यालयाची पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ७५ इतकी आहे. तर, पदव्युत्तर प्रवेश क्षमता ही २५ इतकी आहे. या दंत वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नामवंत दंत वैद्यक म्हणून सेवा देत आहेत. २४ तास ‘इमर्जन्सी डेंन्टल क्लिनिक’ संचलित करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय व रुग्णालय असल्याची माहिती डॉ. अंद्राडे यांनी दिली आहे.