मुंबई - कोरोना संक्रमित रुग्ण देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो अशी शक्यता राजकीय पातळीवर वर्तवली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे पोलिसांना अधिकार देण्यात आल्यानंतर यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे.
आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 11, 711 नागरिकांवर कारवाई
मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मुंबई शहरात गेल्या काही महिन्यात आतापर्यंत 11, 711 मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतून 4, 395 मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मध्य मुंबईतून 773 तर पूर्व मुंबईतून 1, 317, पश्चिम मुंबईतून 1, 340 तर उत्तर मुंबईतून 2, 652 नागरिकांवर मास्क न वापरण्याच्या नियमाखाली पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोरोना रुग्णांसंदर्भात गुन्हे दाखल
20 मार्च 2020 ते 23 फेब्रुवारी 2021 या काळामध्ये मुंबई शहरात आतापर्यंत कलम 188अन्वये तब्बल 27 हजार 723 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतून 6, 506 गुन्हे दाखल झाले असून मध्य मुंबईतून 2892 , पूर्व मुंबईतून 3755, पश्चिम मुंबईतून 3, 162 तर सर्वाधिक उत्तर मुंबईतून 10, 708 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दाखल गुन्ह्यामध्ये कोरोना रुग्णांसंदर्भात गुन्हे दाखल असून हॉटेलला स्थापन नियमापेक्षा अधिक वेळ चालू ठेवणे, इतर दुकाने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध वाहतूक व मास्क न वापरण्याच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले आहेत.
200 रुपयांचा दंड
कोरोनासंक्रमण थांबविण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे अन्यथा त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर बाळगणे, वारंवार हात धुणे व चेहऱ्यावर मास्क लावणे या संदर्भात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबईतील गर्दीची ठिकाणे ही मुंबई पोलिसांच्या नजरेत असून नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.