मुंबई- मुंबईत पावसाला सुरुवात होताच दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. चेंबूर आणि साकीनाका येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असताना मंगळवारी (दि. 21 जून) घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे कंपाऊंडची भिंत कोसळल्याने तीन जण जखमी झाले. त्यापैकी एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. आजही मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तीन जणांना बाहेर काढले -घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे वन विभागाच्या जागेवर जय अंबे नगर झोपडपट्टी आहे. येथील एका घरावर काल ( मंगळवारी) दुपारी पाउणे दोन वाजण्याच्या सुमारास कंपाऊंडती भिंत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. या तिघांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले.