मुंबई -राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. तसेच मुंबई शहरात देखील कोरोनाचा धोका वाढला आहे. मुंबई पोलिसांना कोरोनाशी लढण्यासाठी आता नवे सुरक्षा कवच मिळणार आहे. पोलिसांसाठी संपूर्ण चेहरा कव्हर होईल, असे पर्सनल प्रोटेक्शन कीटचे वाटप केले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. मुंबईत त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वहस्ते या पर्सनल प्रोटेक्शन कीटचे वाटप केले आहे.
मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या हस्ते 'पर्सनल प्रोटेक्शन कीट'चे वाटप
लॉकडाऊन काळात राज्यातील पोलीस उत्तम कार्य करत आहेत. कोरोना विषाणूचा मुकाबला करताना पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केले.
हेही वाचा...केरळच्या प्राध्यापकाने बनवले कमी खर्चातले 'पोर्टेबल व्हेंटिलेटर'
कोरोना विरुद्धच्या लढ्यात सर्वात अग्रणी भूमिका पोलिसांची आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखत असताना पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा देखील महत्वाची आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलीस दल अविरतपणे कार्यरत आहे. सदर काम करताना त्यांचा कोरोना रुग्णांशी व जनतेशी थेट संपर्क येत असल्याने त्यांना संसर्ग होऊ नये, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष मास्क, सॅनिटायझरचे वाटप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याद्वारे करण्यात आले. तसेच कोरोनाचे होम क्वाॅरंटाईन केलेले काही रुग्ण पळून जातात. त्यांना पकडण्यासाठी जाणाऱ्या मुंबई पोलिसांना गृहमंत्र्यांनी 'पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट'चे वाटप केले.