महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई मेट्रो 1मध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांची ऐशी की तैशी

कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचा दावा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)कडून केला जात आहे. पण हा दावा चुकीचा असून मेट्रो गाड्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला.

By

Published : Feb 27, 2021, 4:48 PM IST

Updated : Feb 27, 2021, 5:11 PM IST

मुंबई मेट्रो
मुंबई मेट्रो

मुंबई -वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1मध्ये मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या इतर नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचा दावा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)कडून केला जात आहे. पण हा दावा चुकीचा असून मेट्रो गाड्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला. मेट्रो 1मधील ही गर्दी सुपर स्प्रेडर ठरू शकते, असे म्हणत त्यांनी यावर सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणीही गलगली यांनी केली आहे.

मेट्रो 1मधील गर्दी वाढली

22 मार्च ते 18 ऑक्टोबरपर्यंत मेट्रो 1ची सेवा लॉकडाऊन आणि कोरोनामुळे बंद होती. 19 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल करत मेट्रो 1 ट्रॅकवर आणण्यात आली. कोरोनाची भीती लक्षात घेता सुरुवातीला 50 टक्के प्रवासी क्षमतेने मेट्रो प्रवास सुरू झाला. तर मेट्रो 1च्या फेऱ्या ही खूप कमी होत्या. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात होते. पण फेब्रुवारीपासून मेट्रो 1च्या फेऱ्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्याने लोकलमधून उतरून पुढे मेट्रो प्रवास करणाऱ्याची ही संख्या वाढली आहे. एकूणच आता मेट्रो गाड्यामध्ये गर्दी होऊ लागली आहे.

एमएमओपीएलकडून जनजागृती मोहीम

मास्कशिवाय मेट्रो 1मध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे मास्क घातला जातो. पण गाडीत शिरल्यानंतर मात्र प्रवासी मास्क काढतात वा हनुवटीवर लटकवतात. अशात आता कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. तेव्हा ही बाब दुर्लक्षित करता येत नसल्याचे म्हणत एमएमओपीएलने मेट्रो 1मध्ये मी जबाबदार' मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार मास्क न लावणाऱ्या वा योग्य प्रकारे न लावणाऱ्यांना आधी समज देत जनजागृती केली जात आहे. तर पुढे दंड आकारण्यात येणार आहे, असे एमएमओपीएलने याआधीच जाहीर केले आहे. तर या मोहिमेनुसार मेट्रो गाडीत सुरक्षारक्षक करडी नजर ठेवत असल्याचेही एमएमओपीएलचे म्हणणे आहे.

...तरीही नियमाचे उल्लंघन!

मेट्रो 1मध्ये मी जबाबदार मोहीम राबवली जात असली तरी प्रत्यक्षात चित्र मात्र उलट असल्याचे गलगली यांनी सांगितले आहे. मेट्रो गाडीत उभे राहून प्रवास करण्यासाठी पुरेशी जागा असताना प्रवासी आसनावर गर्दी करून बसतात. फिजीकल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. तर याचा एक व्हिडिओ ही त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. या पार्श्वभूमीवर यातून कोरोना वाढू शकतो, असे म्हणत गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि एमएमओपीएलला पत्र लिहीत नियम मोडणाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Last Updated : Feb 27, 2021, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details