मुंबई - बेस्ट कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला आहे. वेतन करार केला जात नसल्याने, कामगार आणि कामगार संघटनांच्या नेत्यांनी वडाळा आगाराबाहेर उपोषण सुरु केले आहे. असे असताना मुंबईच्या महापौरांनी मात्र, संप होणारच नाही असे म्हटले आहे. तर महापौरांच्या या वक्तव्यामुळे बेस्ट कामगारांमध्ये महापौरांच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत बेस्ट कामगार संपावर? संप होणारच नाही, महोपौरांचे वक्तव्य
वेतन करार केला जात नसल्याने, कामगार आणि कामगार संघटनांच्या नेत्यांनी वडाळा आगाराबाहेर उपोषण सुरु केले आहे. मात्र, मुंबईच्या महापौरांनी संप होणारच नाही, असे म्हटले आहे. यामुळे बेस्ट कामगारांमध्ये महापौरांच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बेस्ट कामगारांचा वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, कामगारांना बोनस द्यावा आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने सोमवारपासून दोन दिवस धरणे आंदोलन केले. दरम्यान, शिवसेनेच्या कर्मचारी संघटनेने आज २७ ऑगस्टला वेतन करार करु, असे जाहीर केले होते. त्यामुळे आज वेतन करार न झाल्यास कृती समितीने संपाचा इशारा दिला होता. या अनुषंगाने आज मंगळवारी बेस्ट महाव्यवस्थापकांनी कृती समितीच्या शशांक राव यांना चर्चेला बोलावले. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने राव यांनी उपोषण सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी शिवसेनेच्या युनियन पदाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्त व बेस्टचे महाव्यवस्थापक यांची भेट घेतली. या बैठकीत सातवा वेतन लागू करावा व त्यासंदर्भात वेतन करार येत्या दोन दिवसात करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसात वेतन करार होणार असल्याने संप होणार नाही. संप होणार नसल्याने कोणत्याही कामगारांवर कारवाई करण्याची गरज पडणार नाही, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.