मुंबई -मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू, हिवताप स्वाईन फ्ल्यू यासारखे आजार ( Monsoon Desease ) समोर येतात. मागील वर्षापर्यंत या आजारांमुळे काही मृत्यूही झाले होते. यावर्षी आतापर्यंत पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही. यासाठी आजार आणि मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. साथीचे आजार वाढल्यास वेळीच उपचार मिळावे यासाठी पालिकेच्या विविध रुग्णालयात दीड हजार बेड्स अॅक्टिव्ह करण्यात आले आहेत. गरज पडल्यास बेड्सची संख्या वाढवण्यात येणार आहे. मलेरिया रुग्णांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी भर दिला जात असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू या आजाराचे रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी औषधसाठा पुरेसा उपलब्ध करण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका असून यासाठी संपूर्ण मुंबईतून रोज पाण्याचे २०० नमुने संकलित करण्यात येत असून कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
पालिकेकडून जनजागृती -पावसाळी आजार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात बॅनर्स, होडिंग, पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. तसेच आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली आहे. पाणी उकळून व गाळून प्यावे, आपल्या परिसरात पाणी जमा होऊ देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन गोमारे यांनी मुंबईकरांना केले आहे.
गेल्या सहा महिन्यात एकही मृत्यू नाही -१ जानेवारी ते २६ जून २०२२ पर्यंत मलेरियाचे १२०७, लेप्टोचे ३४, डेंग्यूचे ११७, गॅस्ट्रोचे २८१९, हेपॅटिटीसचे २४६, चिकनगुनियाचे ५ तर एच १ एन १ चे ४ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यात पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही. १ ते २६ जून २०२२ पर्यंत मलेरियाचे ३१४, लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३३, गॅस्ट्रोचे ४५६, हेपॅटिटीसचे ५७, चिकनगुनियाचे १ तर एच १ एन १ चे २ रुग्ण आढळून आले आहेत.