मुंबई -कॉंग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष मिळावा यासाठी गेले दोन दिवस काँग्रेसमध्ये घमासान सुरू होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजस्थान, छत्तीसगड येथे काँग्रेसची सत्ता आली. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर त्यांना नैराश्य आलं असेल आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा राहुल गांधींचा निर्णय मला पटला नव्हता, असेही संजय राऊत म्हणाले.
काँग्रेस हा देशातील मुख्य विरोधीपक्ष आहे. काँग्रेसमध्ये विस्कळीतपणा आला आहे, त्यातून पक्षाने सावरावे. देशभरातील प्रत्येक गावात, अगदी उत्तर आणि पश्चिमेपासून ईशान्य भारतापर्यंत, प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. पण विरोधीपक्ष म्हणून त्यांनी उभारी घेण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.