महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 16, 2020, 6:57 PM IST

ETV Bharat / city

कृषी कायद्याविरोधात ५० लाखांपेक्षा जास्त सह्या; काँग्रेसच्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसने सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातून तब्बल ५० लाखांपेक्षा जास्त सह्या करून पाठिंबा दर्शवला आहे

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात


मुंबई- केंद्रातील भाजपा सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी सुरू असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. याच आंदोलनातील एक भाग म्हणून सुरू केलेल्या सह्यांच्या मोहीम देखील यशस्वी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. तब्बल ५० लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करून या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

मागील महिन्याभरापासून राज्यात काँग्रेसने ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या दरम्यान नागरिकांनी केलेल्या या सह्यांचे एक निवदेन उद्या मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.

हे कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे-

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, जुलमी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी २ कोटी सह्यांची मोहिम राबवण्याचे निश्चित केले होते. २ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केले. हे कायदे शेतकऱ्यांना कसे उद्ध्वस्त करणारे आहेत, याची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.

न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहणार

कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान किसान अधिकार दिवस, धरणे आंदोलन, राजभवनवर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले आणि महाव्हर्च्युअल किसान रॅलीच्या माध्यमातूनही भाजपा सरकारच्या या अन्यायी कायद्याला विरोध केला. या महामेळाव्यात राज्यातील १० हजार गाव खेड्यातील ५० लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावतीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला. या दरम्यान सह्यांची मोहिमही राबवण्यात आली. काँग्रेसचा या कायद्याविरोधात संघर्ष सुरू असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरुच राहील, असे प्रांताध्यक्ष थोरात म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details