मुंबई -कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. त्यानुसार, लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून रेल्वेचा पास देण्याची सुरुवात बुधवारपासून केली आहे. गेल्या सात दिवसांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण दोन लाख ९ हजार ३९० पासची विक्री झाली. यामध्ये मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकातून सर्वाधिक पास काढण्यात आले आहेत.
तिकीट खिडक्यांद्वारे पास
कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया ११ ऑगस्टपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) १०९ स्थानकांवर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या मदत कक्षांवर प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यावर आणि छायाचित्र ओळखपत्र पुराव्यावर शिक्का मारून ते पुन्हा नागरिकांना देण्यात येतात. त्यानंतर रेल्वेचा पास काढला जातो. मध्य रेल्वेवर ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत १ लाख ४३ हजार ४६१ पास तर पश्चिम रेल्वेवर ६५ हजार ९२९ पास काढले आहेत. विशेष म्हणजे लसवंतांना पास मिळावा, यासाठी मध्य रेल्वेवर ३४१ आणि पश्चिम रेल्वेवर २७६ अशा ६१७ तिकीट खिडक्या उघडण्यात आल्या आहेत.