महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन - भारतात कोरोनापेक्षाही जास्त मृत्यू कॅन्सरमुळे!

भारतात कोरोनापेक्षाही जास्त मृत्यू कॅन्सरमुळे होत आहेत. भारतात 10 लाख नागरिकांमागे 600 असा कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर आहे.

By

Published : Feb 3, 2021, 5:19 PM IST

Updated : Feb 3, 2021, 10:47 PM IST

more-deaths-due-to-cancer-than-corona-in-india
4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन - भारतात कोरोनापेक्षाही जास्त मृत्यू कॅन्सरमुळे!

मुंबई -मागील वर्षेभर भारतच नव्हे तर जग कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. कोरोनाची प्रचंड भीती आज सगळ्यांच्याच मनात आहे. कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी ही भीती गरजेची आहे. मात्र, आता कोरोना रुग्णांबरोबरच नॉन कोविड रुग्णाच्या त्यातही कॅन्सरच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मागील वर्षभरात कॅन्सरच्या रुग्णांच्या निदान आणि उपचाराकडे दुर्लक्ष झाले आहे. पण आता मात्र असे दुर्लक्ष परवडणारे नाही. कारण कोरोनापेक्षा कॅन्सरचा मृत्युदर किती तरी पटीने अधिक आहे. भारतात 10 लाखांच्या मागे 100 मृत्यू असा कोरोनाचा मृत्यू दर आहे. तर कॅन्सरचा मृत्यूदर 10 लाखांच्या मागे 600 असा आहे. अशात निदान-उपचार वेळेत झाले नाहीत तर कॅन्सरचा मृत्यू दर आणखी वाढण्याची भीती डॉ राजेंद्र बडवे, संचालक, टाटा मेमोरियल यांनी खास 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते.

अमेरिका-इंग्लंडपेक्षा भारतात 'बरी' स्थिती -

मागील काही वर्षांपासून कॅन्सरचे रुग्ण भारतात मोठ्या संख्येने वाढत आहेत. तर 10 लाखांच्या मागे 600 रुग्ण वर्षाला दगावत आहेत. ही बाब चिंतेची असून कॅन्सरवर नियंत्रण आणण्याची आणि मृत्यूदर कमी करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. मात्र, असे असले तरी अमेरिका-इंग्लंडच्या तुलनेत भारताची परिस्थिती बऱ्यापैकी दिलासादायक असल्याचे डॉ बडवे सांगतात. कारण भारतात कॅन्सरच्या 10 लाख रुग्णांपैकी 600 रुग्ण दगावतात. पण अमेरिका-इंग्लडमध्ये 10 लाखांच्या मागे 1100 ते 1200 रुग्ण दगावतात असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण ही अधिक आहे. भारतात आतड्याच्या कॅन्सरचे 1 लाखामागे 10 पेक्षा कमी रुग्ण आढळतात. तर अमेरिका-इंग्लंड मध्ये 1 लाखांच्या मागे 50 ते 60 रुग्ण आतड्याच्या कॅन्सरचे रुग्ण आढळतात. प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण ही देशात 1 लाखामागे 10 पेक्षा कमी असताना अमेरिका-इंग्लंडमध्ये 1 लाखांच्या मागे 50 रुग्ण आढळतात. भारतात स्तनाच्या कॅन्सरच्या रुग्णांचा दर 1 लाखांमागे 30 असा असताना अमेरिका-इंग्लंडमध्ये 110 असा आहे. मात्र, त्याचवेळी भारतात तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण अधिक आढळतात. भारतात 1 लाखांच्या मागे 25 जणांना तोंडाचा कॅन्सर होतो. तिथे अमेरिका-इंग्लंडमध्ये 1 लाखांच्या मागे केवळ 4 ते5 रुग्ण तोंडाच्या कॅन्सरचे आढळतात. याचे कारण म्हणजे आपल्या देशात तंबाखू-गुटखा सेवन अधिक होते. त्यामुळे हे प्रमाण जास्त आहे. पण इतर प्रकारच्या कॅन्सरची परिस्थिती अन्य देशांच्या तुलनेत समाधानकारक असल्याचेही डॉ बडवे यांनी सांगितले आहे.

म्हणून भारतात अन्य देशाच्या तुलनेत कमी कॅन्सर रुग्ण -

अमेरिका-इंग्लंडमध्ये मृत्यूदर आणि रुग्णसंख्या अधिक आहे. याचे कारण म्हणजे भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त चांगली आहे. आपण समतोल आहार घेतो, झोप चांगली घेतो, तर खूप काम करतो. त्यातही महत्वाचे म्हणजे भारतात स्थूलता कमी आहे. स्थूलपणा हे कॅन्सरचे मुख्य कारण आहे. अमेरिका-इंग्लंड सारख्या देशातील नागरिकांमध्ये स्थूलता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कॅन्सर मोठ्या संख्येने या देशातील नागरिकांना होत असल्याचेही डॉ बडवे यांनी सांगितले आहे. त्याचवेळी भारतात जे काही कॅन्सरचे रुग्ण आढळतात त्यात चुकीच्या जीवनशैलीमुळे आढळत असल्याची माहिती डॉ प्रदीप महाजन, तज्ज्ञ डॉक्टर यांनी दिली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, मानसिक तणाव, नैराश्य अशा अनेक गोष्टीमुळे कॅन्सरसारखा जीवघेणा आजार जडत असल्याचेही डॉ महाजन यांनी सांगितले. तर वेळेत निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असून आता पहिल्या टप्प्यातच कॅन्सरचे योग्य निदान करणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशावेळी काहीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ प्री कॅन्सर टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. ज्यांच्या घरात कॅन्सरची हिस्ट्री असेल अशांनी तर वर्षाला ही टेस्ट करणे अधिक आवश्यक आहे असेही डॉ महाजन यांनी सांगितले आहे.

कोरोना काळात कॅन्सरच्या रुग्णांकडे मोठे दुर्लक्ष -

मार्चमध्ये भारतात कोरोनाला सुरुवात झाली आणि एप्रिल-मे मध्ये भारतात कोरोनाचा कहर वाढला. संसर्गजन्य आणि नवीन आजार असल्याने मोठी खबरदारी घेत भारतात लॉकडाऊन करण्यात आले. तर त्याचवेळी सरकारी-पालिका रुग्णालयासह खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचाराला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे नॉन कोविड अर्थात कॅन्सर, मधुमेही, हृदयरोगी यांच्याकडे मोठे दुर्लक्ष झाले. मोठ्या शस्त्रक्रिया थांबल्या, निदान-उपचार प्रक्रिया मंदावली. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे निदान आणि उपचार योग्य वेळेत होणे आवश्यक आहे. अशावेळी कोरोना काळात कॅन्सरच्या रुग्णांना अनेक ठिकाणी वेळेत उपचार मिळाले नसून आताही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता कोरोनाबरोबरच कॅन्सरच्या रुग्णांच्या निदान-उपचाराला गती देण्याची गरज डॉ बडवे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा मृत्यू दर 10 लाखामागे 100 असा आहे. तर कॅन्सरचा 10 लाखांच्या मागे 600 असा मृत्यु दर आहे. तेव्हा जर यापुढे ही कॅन्सर रुग्णांच्या निदान-उपचाराकडे दुर्लक्ष झाले तर हा मृत्युदर वाढेल अशी भीती ही डॉ बडवे यांनी व्यक्त केली.

भूक लागेल तेव्हा खा, चाला आणि योग्य झोप घ्या -

कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र, त्यातही चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या पद्धती हे मुख्य कारण असल्याचे सातत्याने समोर येत आहे. याच चुकीच्या सवयीमुळे स्थूलपणा वाढत आहे आणि स्थूलपणा म्हणजे 13 प्रकारच्या कॅन्सरला निमंत्रण. त्यामुळे योग्य आहार घ्या. भूक लागेल तेव्हाच जेवा, समतोल आहार घ्या, झोप जास्त घ्या, खूप चाला, वजन नियंत्रणात ठेवा असेही डॉ बडवे आणि डॉ महाजन सांगतात. या गोष्टी पाळल्या तर नक्कीच कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून आपण दूर राहू असा विश्वास डॉ बडवे यांनी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने व्यक्त केला आहे. दरम्यान लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण खूप कमी असून ही दिलासादायक बाब आहे. पण तरीही मुलांमध्ये स्थूलपणा येणार नाही याची काळजी घ्या. त्यांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळायला लावा असेही डॉ बडवे यांनी सांगितले आहे.

Last Updated : Feb 3, 2021, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details