मुंबई- राज्याच्या राजकारणामध्ये सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष स्वबळाचाचा नारा देतोय. यावर शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या मागणीचा समाचार घेतला. दुसरीकडं तपास यंत्रणांच्या तपासाला कंटाळून आणि फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत आपण पुन्हा एकदा भाजप सोबत युती करूया, अशा आशयाचे पत्र लिहिले. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना भवन इथं शिवसेना आणि भाजप या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे चित्र देखील दिसून आले. कदाचित या सगळ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर व्यथीत झाले असावे आणि त्यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अमेय खोपकर यांचे ट्विट..
‘माझ्या महाराष्ट्रात राजकारण्यांचे सत्तेसाठी सुरु असलेले किळसवाणे ‘प्रताप’ बघितले की पुन्हा एकदा खात्री पटते… “मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….”हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल’, असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलंय. राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यास तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल, असं खोपकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.