मुंबई -बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कातच उभारले जाईल असे सांगत महापौर बंगला ताब्यात घेण्यात आला. मात्र गेल्या काही वर्षांत स्मारकाबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. यावरून मनसेचे संदिप देशपांडे यांनी 'स्मारक की मातोश्री 3' असा खोचक सवाल शिवसेनेला विचारला आहे.
स्मारकासाठी महापौर बंगला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 ला निधन झाले. बाळासाहेबांनी शिवाजी पार्क आपल्या भाषणांनी गाजवले आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक शिवाजी पार्क मैदानाजवळ उभारले जावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांच्या बंगल्याची जागा मागण्यात आली. मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात 2018 मध्ये महापौर बंगला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यात आला. मात्र अद्यापही या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेले नाही. यावरून संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.