मुंबई - मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात महानगरपालिकेने खडी टाकल्याने मनसेने सकाळपासूनच धरणे आंदोलन केले. माजी आमदार नितीन सरदेसाई व मनसे नेते संदीप देशपांडे यांचे नेतृत्वात हे आंदोलन केले. मैदानात खडी टाकून रस्ता बनवला जात असल्याने मनसे व शिवाजी पार्कच्या परिसरातील नागरिकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
शिवाजी पार्क मैदानात खडी टाकण्याच्या मुद्द्यावरून मनसेचे आंदोलन पार्कात खडी टाकू नका - मनसेची मागणी
शिवाजी पार्क हे खेळाचं व व्यायामाच मैदान आहे. इथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण खेळत असतात व सकाळी संध्याकाळी व्यायाम करत असतात. परंतु, पालिकेकडून पार्कात 'मड ट्रॅक'चे काम सुरू असल्याने त्यासाठी खडी टाकण्यात आली आहे. भविष्यात या मड ट्रॅकचा रस्ता म्हणून वापर करू शकतात. त्यामुळे मैदानाचे पावित्र घालवू नका, अशी मागणी मनसेची आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी केला विश्वासघात -
यासंदर्भात बोलताना मनसे नेते नितीन सरदेसाई व संदीप देशपांडे म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच आम्ही यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी खडी टाकणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, आता पालिकेकडून मध्यरात्रीच याठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. सध्या आम्हाला पोलिसांनी आंदोलन थांबवण्याच आवाहन केलं आहे. आम्हाला पोलीस सध्या नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जात आहेत. निर्णय होईपर्यंत काम थांबवण्याचे पोलिसांनी आश्वासन दिले" असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे.