मुंबई -राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यावरुन राजकारण तापले असताना हॉस्पिटलच्या दारात जी प्रार्थना होते तीच खरी प्रार्थना आहे, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. डॉक्टर हेच खरे देव आहेत. देव कसा आहे, हे डॉक्टरांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, असे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय परिसरात बांधण्यात आली आहे. या नवीन इमारतीचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
'डॉक्टरांकडून डोक्यावर बर्फ ठेवून काम करायला शिकलो' :कोरोना काळात मुंबई महापालिकेने, डॉक्टरांनी चांगले काम केले. मुंबईत राबवलेल्या मुंबई मॉडेलची जगभरात चर्चा होते. कोविडचा सर्वाना कंटाळा आला, मात्र डॉक्टर आजही काम करत आहेत. कोरोना काळात प्रचंड दबावाखाली डॉक्टर काम करत आहेत. त्यावेळी ते डोक्यावर बर्फ ठेवून काम करत होते. राजकारणात डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे लागते. डॉक्टरांकडून डोक्यावर बर्फ ठेवून काम कसे करायचे हे शिकलो, असे ठाकरे म्हणाले.