मुंबई -राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना लागू केली आहे. या योजनेत अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ३० हजारांपर्यंतच्या उपचारांची व आर्थिक मदतीची हमी मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबतचे अध्यादेश काढले आहेत.
राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर झालेल्या अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार व्यक्तींचा मृत्यू पावतात. अपघातानंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचवणे शक्य झाले असते. ही बाब विचारात घेत, ठाकरे सरकारने बाळासाहेबांच्या नावाने विमा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना लाभ मिळणार आहे. अपघातातील व्यक्ती अन्य राज्य व विदेशातील असली तरीही त्यांना योजनेंतर्गत वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर'मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेकरिता आर्थिक निधीची तरतूदीला मंजुरी दिल्याचे अध्यादेश काढले आहेत.