मुंबई - वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. राज्यात तूर्तास मास्कसक्ती नको, तर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना त्यांनी टास्क फोर्स अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तब्बल सव्वा तास सुरु होती बैठक -मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची तब्बल सव्वा तास बैठक चालली. या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णाची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहे. ज्यामध्ये सार्वजिनक ठिकाणी मास्क वापरण्याचे आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन नागरिकांना करावेत. पुढील १५ दिवस खूप महत्वाचे आहेत. या वाढत्या कोविड रुग्ण संख्येवर राज्याचे बारीक लक्ष आहे. मात्र, राज्यात तूर्तास मास्क सक्ती नसली तरी, कठोर नियमावली टाळण्यासाठी सर्वानी कोविड नियम पाळावेत अशा सूचना सुद्धा टास्क फोर्स अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.