मुंबई - आम्ही 'मराठा जोडो' आंदोलनाच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची तयारी करत आहोत, परंतु सरकारकडून आमची सर्व आंदोलने दडपली जात आहेत, त्यामुळे सरकारने आमचा अंत पाहू नये, सरकारची अशीच भूमिका राहिली तर, कोरोना आणि त्याचा प्रभाव कमी झाल्यास सरकारला आम्ही शांत बसू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा कडून देण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी सरकारला हा गंभीर इशारा दिला.
कोरोना संपल्यावर आम्ही सरकारला शांत बसू देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत सावंत म्हणाले की, आमची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, सरकारने आमचा अंत पाहू नये. अनेक विद्यार्थ्याचे प्रवेश थांबले आहेत, त्यावर तातडीने मार्ग काढावा. अन्यथा, आम्ही सरकार विरोधात रान पेटवू असाही त्यांनी इशारा दिला. तसेच आमचा लढा गरीबविरुद्ध श्रीमंत मराठा यांच्याविरोधात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारने जिथे चूक केली ती त्यांनी दुरुस्त केली पाहिजे, मात्र यात केवळ राजकारण झाले तर समाजाला न्याय मिळणार नाही असेही पाटील म्हणाले.सरकारकडून मराठा समाजाला वेगळ्या जागा राखून ठेवून नोकर भरती केले जाण्याचे बोलले जात आहे त्यावर विचारले असता, मराठा क्रांती मोर्चाचे अभिजीत पाटील म्हणाले की, सरकार आमची फसवणूक करत आहे. नोकर भरती करताना आम्हाला वेगळ्या जागा ठेवून ती भरती करता येणार नाही, तशी कायद्यात तरतूद नाही. यामुळे आम्ही ही भरती होऊ देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.
उद्या मुंबईत मराठा संघर्ष यात्रामराठा क्रांती मोर्चा कडून 'मराठा जोडो,' 'मराठा आरक्षण जनजागृती' अभियान राबवले जात असून त्याच पार्श्वभूमीवर उद्या रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मराठा संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. वरळी येथील जांभोरी मैदान येथून या संघर्ष यात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा दादर, बांद्रा, खार दांडा, सांताक्रुझ, विलेपार्ले, मालाड आणि दहिसर येथे पोचेल. या यात्रेचा समारोप दहिसर येथे होणार आहे. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा कडून एका सभेचे आयोजन करण्यात आले असून पुढील आंदोलनाची दिशा आणि मराठा समाजाच्या जनजागृती संदर्भात या मोर्चात चर्चा केली जाणार असल्याची माहिती प्रशांत सावंत यांनी दिली.
आरक्षणाच्या सद्यस्थितीवर चर्चा होणारमराठा क्रांती मोर्चाकडून काढण्यात येणाऱ्या या संघर्ष मोर्चात दादर, बांद्रा, खार दांडा, सांताक्रूझ येथे विविध सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांमध्ये मराठा आरक्षणाची सद्यस्थिती व राज्य सरकार बाबतची अस्वस्थता यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून पुढील आंदोलनाची तयारी कशी असेल आणि त्या संदर्भातली माहिती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना दिली जाणार आहे. सरकारकडून विविध आंदोलनावर केल्या जाणाऱ्या दडपशाहीच्या भूमिकेचा ही यावेळी निषेध व्यक्त केला जाणार आहे.