मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे,त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची ‘लाख’मोलाची कामगिरी बजावायला ‘लाखे’चा वापर केला जाणार आहे. त्यासाठी लाखेचे६ लाख८१ हजार नग कांडी लागणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणूक काळातील ही पहिलीच वेळ असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
सरकारी कामातील जप्ती असो अथवा कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो, शासकीय कारवाईत‘लाखे’ची लाल मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यापूर्वी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्यामुळे मतपेटी व इतर साहित्य सीलबंद केली जात. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आल्यानंतर या यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र यांनाही सील केले जाते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट,व्हीव्हीपॅट यंत्र,मतदारांची नावे असलेली यादी आदी साहित्य मतदानाची वेळ संपल्यानंतर सीलबंद केली जाते. सर्व साहित्य ठेवण्यासाठी आऊटर पेपर,ग्रीन पेपर व व्हीव्हीपॅटसाठी पिंक पेपरचा वापर केला जातो. त्यावर लाख लावून सीलबंद केले जाते. सील करण्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते. मतमोजणीच्या दिवशी हे सील काढले जाते असे निवडणूक विभागाने सांगितले.