ठाणे- आपला देश अजूनही वैचारिक पारतंत्र्यात असून, स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर भाजपसारख्या जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर केले पाहिजे असे मत आज युवा नेता कन्हैय्या कुमार याने व्यक्त केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ आलेल्या कन्हैया कुमार यांनी मुंब्रामधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये वीर सावरकर तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर बोलताना, बरोबर निवडणुका आल्यावरच यांना सावरकर आणि फुले कसे आठवतात? असे म्हणत, त्यांना भारतरत्न द्यायचेच होते, तर गेल्या पाच वर्षांमध्ये का नाही दिले? असा प्रश्न त्यांनी विचारला. मतदारांना बेरोजगारी, गरिबी, शेतकरी आत्महत्या, महागाई, यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे वळविण्यासाठीच भारतरत्नचा मुद्दा पुढे आणला गेल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली. इंग्रज सरकार ज्याप्रमाणे 'डिव्हाईड अँड रूल' पद्धतीचा वापर करत होते, त्याप्रमाणेच भाजप सरकार 'डायव्हर्ट अँड रूल' करत आहे, असेही ते म्हणाले.