मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेने पाडले होते. याविरोधात नुकसान भरपाईसाठी कंगनाने 2 कोटींचा दावा केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निकाल दिला. यावर अभिनेत्री कंगना रणौतने समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा -कंगनाला नुकसान भरपाई मिळणार -उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका
'माझा पूर्वीपासूनच कायद्यावर विश्वास होता आणि हा लोकशाहीचा विजय आहे,' असे कंगनाने म्हटले आहे. 'याबरोबरच ही याचिका दाखल केल्यानंतर ज्या लोकांनी माझी खिल्ली उडवली होती, त्यांची मी आभारी आहे. ज्या लोकांनी माझ्या विरोधात जाऊन वक्तव्ये केली होती, अशा लोकांमुळेच माझा लढा देण्याचा आत्मविश्वास आणखी वाढला,' असे कंगनाने म्हटले आहे.
कंगनाची प्रतिक्रिया
'जेव्हा एखादी एकटी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते, तेव्हा तो केवळ त्या एकट्या व्यक्तीचा विजय नसतो. तर, तो लोकशाहीचा विजय असतो. ज्यांनी मला धैर्य दिले त्यांची मी आभार मानते आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांचा उपहास केला, त्यांचेही मी आभार मानते. तुम्ही खलनायकाची भूमिका घेतल्यामुळेच मला नायकाची भूमिका घेता आली,' असे कंगनाने ट्विट करत म्हटले आहे.
न्यायालयाची प्रशासन, कंगनाला समज
दरम्यान, कंगनाच्या बाजूने निकाल देतानाच न्यायालयाने तिला समजही दिली आहे. कुठल्याही विषयावर वक्तव्य करत असताना, समाज माध्यमांवर टीका-टिप्पणी करतेवेळी भान राखणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, एखाद्या नागरिकाने जरी त्याच्या सोशल माध्यमांवर कितीही मूर्खपणा केला किंवा कितीही उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या तरी सरकार व स्थानिक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे सोयीस्कर असते, असेही सांगत न्यायालयाने प्रशासनाने सूडबुद्धीने कारवाई करणे योग्य नसल्याचा शेरा मारला आहे.
हेही वाचा -'टीका-टिप्पणी करतेवेळी भान राखणे गरजेचे', कंगनालाही न्यायालयाने दिली समज