मुंबई - मुंबईबद्दल वादग्रस्त विधान करणारी सिने अभिनेत्री कंगना रनौतचा मणीकर्णिका प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयावर पालिकेने तोडक कारवाई केली. यासंदर्भात उच्च न्यायालयाने स्टे दिल्यानंतर पालिकेकडून दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कंगनाने न्यायालयाकडे केली आहे. या संदर्भात न्यायालयात 22 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
कंगनाचा मुंबई महापालिकेविरोधात 2 कोटींचा नुकसान भरपाईचा दावा
अभिनेत्री कंगना रनौत ही दोन दिवसापूर्वीच हिमाचल प्रदेशमधील आपल्या घरी परतली आहे. तेथून तिने आपल्या वकिलाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात आपल्या कार्यालयाचे मुंबई महानगर पालिकेने नुकसान केले आहे. याची नुकसान भरपाई म्हणून पालिकेने २ कोटी द्यावे,असा दावा तिने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे.
मुंबई हे पाक व्याप्त काश्मीर आहे का असा प्रश्न उपस्थित करत मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली. इतकेच नव्हे तर मी मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असे खुले आवाहन कंगनाने राज्यातील शिवसेना सरकारला दिले. याच दरम्यान पालिकेने कंगनाच्या पालीहिल मणिकर्णिका प्रॉडक्शन हाऊस या कार्यालयाला बेकायदेशीर बांधकाची नोटीस दिली. या नोटीसनंतर 24 तासात पालिकेने कंगनाच्या कार्यालयात कारण्यात आलेले बेकायदेशीर बांधकाम 9 सप्टेंबर तोडले. याच दरम्यान कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पालिकेच्या तोडकामाला स्टे देत 22 सप्टेंबरला सुनावणी ठेवली. यावेळी न्यालायाने पालिकेला कोणतेही बांधकाम तोडू नये, असेही आदेश दिले. याप्रकरणी कंगना आणि पालिकेला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले असता पालिकेने अॅफिडेव्हीट फाईल केले. मात्र, कंगनाच्या वकिलांनी वेळ मागून घेतली होती.
पालिकेने कंगनाचे कार्यालय तोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कंगनाने कार्यालयाला भेट देऊन किती नुकसान झाले याची माहिती घेतली. त्याचवेळी दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई देण्याची मागणी केली जाईल, असे सांगितले जात होते. यासंदर्भात कंगनाने राज्यपालांची भेट घेऊनही नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच न्यायालयातही नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधला असता न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.