मुंबई -जावेद अख्तर मानहानी प्रकरणी (Javed Akhtar Defamation Case) जावेद अख्तर यांच्याकडून अभिनेत्री कंगना रनौतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी (Javed Akhtar file application to issue non bailable warrant against Kangana Ranaut) करण्यात आली आहे. यासंदर्भातील नवा अर्ज आज महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर दाखल करण्यात आला आहे. तसेच कंगनातर्फे प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोपही जावेद अख्तर यांच्यातर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जानेवारी (Next Hearing of Javed Akhtar Defamation Case) रोजी होणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
'अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.