मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील भाजपमधील वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या पंधरा दिवसात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात पक्षश्रेष्टी कारवाई करतील, असे सुतोवाच नाराज भाजप नेत्यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासमोर भाजपचे पराभूत नेते राम शिंदे, शिवाजी कर्डीले आणि बाळासाहेब मुरकूटे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी पक्षातील काही मतभेद या नेत्यांच्या कानावर घातले. स्थानिक पातळीवरील काही मुद्यांवर विखे पाटील यांच्या समोरच चर्चा केली. आम्ही आमची बाजू मांडली. त्याचा लवकरच अहवाल केला जाईल. त्यांनतर पक्ष आपली भूमिका घेईल, असे शिंदे यांनी सांगितले. तर फडणवीस यांनी अतिशय गांभीर्याने आमचे म्हणणे ऐकले असून लवकरच ते कारवाई करतील, असा विश्वास बाळासाहेब मुरकूटे यांनी व्यक्त केला.