मुंबई- शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज (Indrani Mukherjees bail) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) पुन्हा फेटाळला आहे. इंद्राणीने जामिनासाठी 2007 पासून केलेला हा सहावा अर्ज आहे.
शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सहाव्यांदा जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. अर्जात इंद्राणी मुखर्जीने तिच्यावर लावण्यात आलेले गुन्हे हे विसंगत असून साक्षीदारांवर दबाव टाकून साक्ष घेण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणात तपास करत असलेल्या सीबीआयकडून जामिन अर्जाला विरोध करण्यात आला आहे.
इंद्राणीच्या वकिलांनी ही मांडली बाजू
या प्रकरणात माफीचा साक्षीदार झालेला ड्रायव्हर श्यामवर राय याने शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात पिस्तुल बाळगले नव्हते. शीना बोरा हत्याकांड खटल्यात त्याने पिस्तुल बाळगल्याचा कथित जबाब दिला आहे. त्यामुळे ही विसंगती आहे. शिवाय पोलिसांनी सन 2012 मध्ये हस्तगत केलेला सांगाड्याचा पुरावा ठोस नाही असे मुद्दे मांडत इंद्राणीच्या वकिलांनी जामीन देण्याची विनंती केली. तसेच भायखळा तुरुंगात असलेली इंद्राणी अनेक आजारांनी ग्रस्त असल्याचे कारणही दिले.
सीबीआयने ही मांडली बाजू
श्यामवर रायचा कबुलीजबाब आणि सरकारी पक्षांच्या साक्षीदारांच्या साक्षींची तपासणी व त्यांची विश्वासार्हता ही खटल्याच्या सुनावणीतच तपासली जाऊ शकते. या खटल्यात न्यायालयाने आरोपींविरोधात आरोप निश्चित केले असून, सुनावणी सुरू आहे. आरोपी इंद्राणीने यापूर्वी चार वेळा केलेले अर्ज न्यायालयांनी फेटाळून लावले आहेत. पुन्हा तशाच मुद्द्यांवर केलेला हा पाचवा अर्ज आहे, असा युक्तिवाद सीबीआयतर्फे अॅड. संदेश पाटील यांनी केला. त्यानंतर उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. 50 वर्षीय इंद्राणी मुखर्जी गेली 6 वर्ष तुरूंगात आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात 253 पैकी केवळ 68 साक्षीदार आजवर तपासून झाले आहेत. त्यामुळे हा खटला लवकर संपण्याची काहीही चिन्ह नाहीत. अशा परिस्थितीत आणखीन किती काळ आरोपीला तुरूंगात ठेवणार? असा प्रमुख सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आला होता.
इंद्राणीला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येण्याची भीती-
मुलगी शीना बोराचे अपहरण, हत्या आणि मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात इतर सह आरोपींसोबत सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट करत सीबीआयने जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता. यापूर्वी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यात यावा अशी विनंती इंद्राणीनं कोर्टाकडे केली होती. कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यासाठी योग्य ती काळजी खबरदारी कारागृह प्रशासन घेत आहे. त्यामुळे कारागृहातील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारागृहात आता योग्य प्रमाणात औषधे इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तसेच याचिकाकर्त्या या कारागृहातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे नमूद करत न्यायालयाने इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. इंद्राणीला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्याचा थेट परिणाम खटल्यावर होईल म्हणून त्यांना जामीन देण्यात येऊ नये अशी भूमिका तपासयंत्रणेकडून मांडण्यात आली होती.