मुंबई- जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमध्ये सोयी-सुविधा देण्याचे काम महापालिका करते. मुंबई महापालिकेला श्रीमंत महापालिका असेही संबोधले जाते. अशा या श्रीमंत महापालिकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली असून, सध्या विविध बँकांमधील ठेवीची रक्कम ८० हजार ३४२ कोटी ८५ लाख रुपयांवर गेली आहे.
ठेवी मोडून कोरोनावर खर्च
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यावर जानेवारी २०२१ मध्ये नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले. फेब्रुवारी २०२१ च्या मध्यापासून पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णसंख्या वाढू लागली. या दरम्यान लॉकडाऊन असल्याने पालिकेला कराद्वारे मिळणारे उत्पन्न बंद झाले होते. रुग्णांना सोयी-सुविधा देताना, तसेच त्यांच्यावर उपचार करताना मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात २५०० कोटीहून अधिक निधी खर्च झाला आहे. हा खर्च पालिकेच्या बँकेमधील ठेवी मोडीत काढून करण्यात आला आहे.