मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी ही मुंबईतील कोरोनाचा एक मोठा हॉटस्पॉट मानली मानली जात होती. मात्र गेल्या महिनाभरापासून धारावीमधील कोरोना रुग्णसंख्येमध्ये कमालीची घसरण आढळून आली आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे!
मे महिन्यामध्ये दिवसाला सरासरी ४३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असलेल्या धारावीमध्ये, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत दिवसाला सरासरी १९ नव्या रुग्णांची नोंद होत होती. रुग्णसंख्येला आळा घालणाऱ्या या पॅटर्नचे कौतुक केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील केले. इतकेच नव्हे, तर दिल्लीसह अनेक राज्यांना या पॅटर्नचा अवलंब करण्याचा सल्लाही मंत्रालयाने दिला.
तब्बल एक लाखांहून अधिक झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे, दहा लाखांहून अधिक लोक म्हणजेच धारावी! याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात पर्सनल स्पेस असा नाहीच. एका छोट्याश्या खोलीत आठ-दहा लोक ज्याठिकाणी झोपतात, तिथे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यास सांगणे हाच मुळाच विनोद आहे. त्यामुळेच, याठिकाणी कोरोनाच्या प्रसाराला आळा घालणे हे सगळ्यात मोठे आव्हान प्रशासनापुढे होते.
लोकांचा विश्वास..
सुरुवातीला लोक कोरोनाला एवढे घाबरले होते, की लक्षणे आढळल्यानंतरही ते स्वतः पुढे येऊन त्याबाबत सांगण्यास कचरत होते. त्यामुले प्रशासनाला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गरजेची असलेली पहिली पायरीच ओलांडता येत नव्हती. यावर उपाय म्हणून प्रशासनाने स्थानिक डॉक्टरांची मदत घेतली.
हे स्थानिक डॉक्टर, जे बऱ्याच लोकांचे फॅमिली डॉक्टरही होते. त्यामुळे या डॉक्टरांजवळ आपल्या अडचणी, तक्रारी सांगण्यास ते लोक घाबरत नव्हते. त्यानंतर, प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी साधे तापाचे दवाखाने उघडले. जिथे लोक आपल्या तपासणीसाठी येत. यासोबतच वैद्यकीय पथके डोअर-टू-डोअर तपासणीही करत होते.
डॉ. अनिल पाचनेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की आठवडाभरात साधारणपणे ४७,५०० लोकांची स्क्रीनिंग झाली होती. त्यांपैकी सुमारे १,१०० लोकांना प्रशासकीय विलगीकरणात पाठवण्यात आले, तर सुमारे १५० लोकांना (जे नंतरच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळले होते) रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धारावीमध्ये योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनाला लॉकडाऊनचाही मोठा फायदा झाला. परराज्यातील सुमारे चार लाख स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांमध्ये परतल्यामुळे धारावीमधील जनसंख्या कमी झाली, ज्यामुळे प्रशासनाला अधिक वेगाने काम करता आले. कमी लोकसंख्येमुळे प्रशासानाला स्थानिक दवाखान्यांमधील कोरोना चाचण्या वाढवता आल्या, आणि डोअर-टू-डोअर स्क्रीनिंगही वेगाने करता आले.